भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा (भिवरा) इंद्रायणी- भामा- नीरा यांना पोटात घेत पंढरपुराजवळ येते. रेल्वे पूल ते विष्णूपद या पाच किलोमीटर अंतरामध्ये ती तीन वेळा अर्धवर्तुळाकार होते. म्हणून लोकांनी तिला चंद्रभागा नाव दिले. स्कंद पुराणातील माहात्मेय ‘चंद्रभागा’ नावाचे सरोवर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराजवळ (जे मंदिर विठ्ठल मंदिराचे आधीचे आहे.) होते, असे सांगते. तर, संत जनाबाई ‘भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा’ असा दोन्ही नद्यांचा उल्लेख करतात. पंढरपूर सोडले की चंद्रभागा पुन्हा नाव बदलते. नद्यांचा अभ्यास करणाऱ्यांना हे नावाचे कोडे उलगडलेले नाही. इ.स. १८५० सालच्या सुमारास चौफाळा भागात मुरलीधराचे मंदिर बांधताना पाया खणताना फार मोठा वाळूचा पट्टा तेथे सापडला होता. म्हणजे विठ्ठलाच्या पूर्वेस व पश्चिमेस दोन्हीकडे जलप्रवाह होते असे दिसते. काळाच्या ओघात आता काही नाही. पंढरपुराच्या पंचक्रोशीतील जवळील नद्या म्हणजे दुर्गादेवीजवळची धारिणी, भुवनेश्वरीजवळची पुष्पावती (जी मूळची यमुना कृष्णाबरोबर पंढरपुरात आली), संध्यावळीजवळच्या शिशुमाला-भीमासंगम, उत्तरेकडे पंचगंगा क्षेत्रामध्ये तुंगा, सती, सुना, भृंगारी आणि पंचगंगा, यांचा भीमेशी संगम होतो. त्यामुळे संत मंडळी अभंगातून बऱ्याच वेळा भीमा भिवराकाठी देव असल्याचा उल्लेख करतात.